गणित शिक्षण – लेखांक क्रमांक 2
दशमान संख्याप्रणाली
दशमान संख्या प्रणाली ही अशी प्रणाली आहे जी आज जगातील बहुतेक लोक वापरतात. या प्रणालीचा आधार म्हणून दहा हा क्रमांक का निवडला गेला हे कोणालाच ठाऊक नाही, परंतु असे मानले जाते की हे मानवाच्या बोटांच्या संख्येमुळे आहे. मोजणीची साधने म्हणून बोटांचे अगदी सहज उपयोजन करता येते. दशमान अंक प्रणालीमध्ये दहा अंक असतात (0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9) आणि संख्यांना दहाच्या गटांनी प्रस्तुत केले जाते.
शून्य प्लेसहोल्डर म्हणून काम करते. जेव्हा संख्येतील विशिष्ट स्थानावर लिहिण्यासारखे काहीही नसते तेव्हा ते स्थान 0 धारण करते. या प्रणालीतील अंकाचे स्थानिकमूल्य गुणाकाराने ठरवले जाते. उजवीकडील स्थानापासून (एकक स्थानापासून) सुरू करून डावीकडे गेल्यावर, मूल्य (1 x अंक), (10 x अंक), (100 x अंक) असेच विकसित होत जाते. डावीकडील प्रत्येक स्थानाची किंमत लगतच्या उजव्या स्थानाच्या मूल्याच्या दहा पट असते.
उजवीकडील प्रत्येक स्थान त्याच्या लगतच्या डावीकडील स्थानाच्या मूल्याच्या 1/10 असते. उदा.111 या संख्येत 1 , 1 व 1 ची स्थानिक किंमत ही डावीकडून अनुक्रमे 1×100= 100, 1 ×10= 10 आणि 1×1 = 1 आहे. तर उजवीकडील प्रत्येक 1 ची स्थानिक किंमत त्याच्या लगतच्या डावीकडील स्थानाच्या मूल्याच्या 1/10 दिसून येईल. याला स्थानिक किंमतीचे गुणाकार तत्त्व म्हणून ओळखले जाते. संख्येचे एकूण मूल्य निश्चित करण्यासाठी दशमान पद्धतीत लिहिलेल्या प्रत्येक अंकाच्या स्थानिक किमतीला जोडले जाते. याला बेरीज तत्व म्हणतात. उदा.(100 x 4) + (10 x 5) + (1 x 6) = (400) + (50) + (6) = 456.
पुढील लेखांकात आपण गणित पेटीतील दशमान ठोकळ्यांचा प्रत्यक्ष वापर करून संख्याज्ञानाची समज विकसित केली जाते हे सोदाहरण पाहू..
अतुल कुलकर्णी
गणितमित्र