दशमान पद्धती_गणित शिक्षण – लेखांक क्रमांक – 4

गणित शिक्षण – लेखांक क्रमांक – 4

दशमान पद्धती

👨‍💼संख्या असतात तरी काय? त्या कशाचं प्रतिनिधित्व करतात? याचा विचार तार्किकपणे केला की कळतं की, संख्या , त्यांवरील क्रिया या मानवी विचारांचं मूर्त रूप…! आहेत. Mathematics is quantisation of human thoughts

👨‍💼 आपण जे पाहतो, मोजतो, सांगतो त्यांना चिन्हांत बसवून मूर्त रुपात पाहण्याची सोय आणि संधी गणिताने निर्माण करून दिली.

👨‍💼 लहान मुलं मोजतात कशी? त्यावेळी वस्तू आणि हाताची बोटे यांची एकास एक संगती कशी असते? त्यामुळे मुलं एका वस्तूवर एक बोट ठेवून वाचतात की त्यामध्ये विसंगती येते ? या सर्व बाबींच निरीक्षण पालक, शिक्षक आणि सुलभक यांनी करणं हे पहिलं आणि महत्वाचं काम असतं. यातून मूल मोजणी करताना स्वतःचे कोणकोणते डावपेच वापरतं हे समजून घेणं आंनददायी आणि सोबतच आपणही खूप शिकण्यासारखं असतं.

👨‍💼 1 ते 9 संख्या कशा शिकवाव्यात यापेक्षा त्या समजून घेण्यासाठी कोणते समृद्ध अनुभव आपण देऊ शकतो यावर जास्त मेहनत घेण्याची गरज आहे. दशमान पद्धतीमध्ये 10, 100, 1000,… असे गट करणे अपेक्षित आहे तेंव्हा 1 ते 10 संख्या सरळ सरळ फळ्यावर लिहिणे, पुन्हा पुन्हा वाचायला सांगणे ईत्यादी पारंपरिक पद्धती कुचकामी ठरतात. कारण 10 हा समान 10 एककांचा गट असतो हे आधी मुलांना दृश्य रुपात पाहायला मिळणं हे कुण्या जादूपेक्षा कमी नाही.

👨‍💼 1 ते 5 हा संख्याज्ञानाचा पहिला नैसर्गिक टप्पा विविध संशोधनातून समोर आला आहे. कारण नजरेच्या टप्प्यात एकावेळी 1 ते 5 संख्या सहज दिसतात. आपणही या वयात मोजणी करताना 5-5 चे गट नजरेच्या एका टप्प्यात पाहतो ना?

👨‍💼 1 ते 5 ची ओळख आणि समज यात खूप अंतर आहे. 1 ते 5 ची समज आधी येते आणि नंतर ओळख पक्की होते हे लक्षात घेऊ.
मुलांच्या भावविश्वात, अनुभवक्षेत्रात 1 म्हणजे नेमकं काय? हे दाखवणं गरजेचं आहे. त्यासाठी गणिताची स्वतःची नैसर्गिक भाषा वापरावी लागेल.

👨‍💼 मी टाळी वाजवतो ती ऐका, पहा व तशीच तुम्हीही वाजवा व सोबत म्हणा… या सोप्या कृतीने 1 ची सुरुवात करता येईल. 1 टाळी, 2 टाळ्या, 3 टाळ्या, 4 टाळ्या, 5 टाळ्या इत्यादी…याच क्रमाने कृतीतुन करून घेता येईल. त्यांनतर आपल्या कल्पकतेने यांत विविधता आणता येईल. टाळ्या, हाताची बोटे, पाटी किंवा फरशीवर दशमान किटमधील एकक हे सर्व एकासएक संगतीने ठेवता येणे, पाहता येणे, सांगता येणे आणि सोबतच लिहिता येणे हे नक्की करावे. जसे – 1 टाळी वाजवा, तेवढीच बोटे दाखवा, तेवढेच एकक फरशीवर ठेवा… यातून 1 टाळी, 1 बोट, 1 एकक असे 1 चे विविध रूपातील दर्शन मुलांना होईल… आणि मग लिहा 1… म्हणा 1 … यातून दिसणे, सांगणे, लिहिणे एकत्र घडेल.. आहे ना गंमत👍

👨‍💼 वर्गात, घरी, सभोवती 1 ते 5 संख्यांची प्रतिनिधित्व करणाऱ्या उदाहरणांवर चर्चा करावी. प्रश्न पेरणे, विचाराला चालना देणे, आपले अनुभव आपल्या शब्दांत मांडणे त्यातून चुकणे आणि शिकणे या सर्व गणिती प्रक्रियाच आहेत हे आपण कधीही विसरता कामा नये..

👨‍💼 बोटं, वस्तू, कृती , चित्र आणि शेवटी संख्या या गणिती भाषांनी 1 ते 5 ची समज ते ओळख हा प्रवास घडणं अपेक्षित आहे..

👨‍💼 1 पासून 5 पर्यंतचा प्रवास दशमान किटमधील एकक मांडून, वाचून आणि लिहून पूर्ण व्हावा… 1 नंतर आणखी 1, मग आणखी 1 …. याप्रमाणे 1 ते 5 संख्या 1 – 1 ने कशा वाढतात ही समज विकसित व्हावी..

पुढील लेखांकात 5 ते 10 चा प्रवास आणि मध्येच 0 नावाचा प्रवासी यांबद्दल बोलू…

धन्यवाद🙏

अतुल…
गणितमित्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *