गणित शिक्षण – लेखांक क्रमांक – 5

दशमान पद्धती-
संख्या 1 ते 9 आणि 0 ची ओळख..

👨‍💼 समृद्ध अनुभव समज कायमस्वरूपी पक्की करतात हे सत्य आहे. दशमान पद्धतीमध्ये 10,100,100 … गठ्ठे आणि सुटे या संबोधांचे अनुभव देण्या अगोदर एक ते नऊ या संख्या आणि त्यांच्या सोबतीला असलेला अतिशय मनोरंजक असा शून्य आपण आजच्या लेखापासून सुरू करत आहोत..

👨‍💼 एक टाळी, एक उडी, एक चित्र, एक वस्तू त्याचप्रमाणे विविध अनुभवातून एक ते पाच संख्यांचे अनुभव विद्यार्थ्यांच्या भावविश्वाला अनुसरून देऊन एक ते पाच ची समज, मांडणी, वाचन आणि लेखन यादृष्टीने प्राथमिक स्तरावर काम करणे अतिशय गरजेचे आहे. अशावेळी मुले एक ते पाच या संख्यांच्या बाबतीत स्वतःचे अनुभव आणि उदाहरणे किती मनोरंजक पद्धतीने देतात हे पाहणे अतिशय आनंददायी असते.

👨‍💼आता एक ते पाच या संख्या प्रत्यक्ष दशमान पद्धतीतील ठोकळ्यांचा उपयोग करून आपण फरशी किंवा पाठीवर मांडणी करून मुलांकडून करून घेणे अपेक्षित आहे. यामध्ये सर्वप्रथम एक पाटी आपण घेऊया सोबत गणित पेटीतील सुटे जे सर्व समान आकाराचे असतील याची दक्षता घेऊन कृतीला सुरुवात करता येईल.

👨‍💼 खेळाच्या माध्यमातून आणि एकास एक संगतीचा मानसशास्त्रीय आधार घेत एक ते पाच या संख्या ठोकळ्याच्या रूपात पाटीवर मांडणी आणि लिहिणे या कृती करून घ्यावयाच्या आहेत, यासाठी आपल्या कल्पकतेनुसार विविध खेळ घेता येतील. जसे- सुलभक अर्थात शिक्षक किंवा पालक विद्यार्थ्यांना सांगतील- मी टाळी वाजवेन ती ऐका आणि तेवढेच ठोकळे घेऊन पाटीवर ठेवा आता प्रत्येकवेळी एक टाळी वाजवून एक एक ठोकळा पाठीवर मुले ठेवत आहेत की नाही हे पाहता येईल.

👨‍💼प्रत्येक वेळी एक ठोकळा वाढल्यामुळे पाठीवर किती समान ठोकळ्यांचा समूह तयार होत आहे हे मात्र मुलांना विचारायला विसरू नये. जसे – पहिला ठोकळा ठेवल्यानंतर मुले म्हणतील एक आणि सोबतच पाटीवर त्याच्या बाजूला लिहितील १. त्यानंतर आणखी एक ठोकळा पाटीवर ठेवला की मग विद्यार्थ्यांना विचारा आता किती ठोकळे तुला पाठीवर दिसतात?

👨‍💼 इथे विद्यार्थी एकेका ठोकळ्यावर प्रत्येक वेळी एकेक बोट ठेवून मोजणी कशी करतात हे आवर्जून पहावे. आता प्रत्येक वेळी एक ठोकळा ठेवला तरी शेवटचा ठोकळा हा गटातील सर्व ठोकळ्यांचा समूह कितीचा आहे हे एकत्रितपणे दर्शवतो हे आपण लक्षात घ्यावयाचे आहे.

👨‍💼 याच पद्धतीने विद्यार्थ्यांना एक एक असे करत पाच ठोकळे पाटीवर ठेवावयास लावावेत. विसरू नये की प्रत्येक वेळी ठोकळा ठेवल्यानंतर समूहात किती ठोकळे दिसतात हे संख्या रूपामध्ये लिहावयाचे आहे.

👨‍💼 या सर्व बाबी मूल स्वतः करत आहे याची खात्री सुलभकाने नक्की करावी. आता पाठीवर पाच ठोकळे दिसतील.

👨‍💼विचारावे- पाटीवर किती ठोकळे आहेत? (प्रतिसाद पहावा)… माझी ५ ची गोष्ट हा मुलांना संधी देऊन बोलण्यास प्रोत्साहन देणारा खेळ घ्यावा… यामध्ये ५ वर आधारित बोलता येणे अपेक्षित आहे.. जसे – फांदीवर ५ चिमण्या बसल्या आहेत. (येथे वर्गातील 100% मुलांनी कृती करून स्वतःची ५ ची गोष्ट सांगावी… यातून मुलं मनाने खुलतात… भीती नावाची गोष्ट ५ च्या गोष्टींमुळे नष्ट होईल… संख्या मांडणे, पाहणे, सांगणे आणि सोबतच लिहिणे हे प्रत्येकाने करावे याबाबत आपण जागरूक राहू..

पुढील लेखात 0 ची ओळख आणि 1 ते 5 वरील बेरीज आणि वजाबाकी यांवर बोलू…

🦚 …अतुल… 🦚
गणितमित्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *