शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. शिप्रधो २०१९ / प्र.क्र. ४३ / प्रशिक्षण, दि.२०.७.२०२१ तील परिच्छेद क्र. २ नुसार वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपविण्यात आलेली आहे. या कार्यालयाचे आदेश जा.क्र. राशैसंप्रपम/ आय.टी./व.नि प्रशिक्षण / २०२३-२४/०३०२९ दिनांक ०७/०७/२०२३ नुसार दिनांक १० जुलै २०२३ पासून वरिष्ठ व निवडश्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणाची अंमलबजावणी सुरु आहे. सदरच्या ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थ्यासाठी विविध घटकांचा अभ्यास व्हिडिओ व पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. दिनांक ०७/०७/२०२३ च्या प्रशिक्षण पत्रानुसार आवश्यक सूचना, मार्गदर्शन प्रशिक्षणार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
तसेच सदर प्रशिक्षणामध्ये सर्व घटकांच्या अभ्यासानंतर एक स्वाध्याय चाचणी व अभिप्राय देखील देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तथापि काही प्रशिक्षणार्थी यांनी संदर्भीय प्रशिक्षण पत्रामध्ये आवश्यक सूचना देऊनही प्रशिक्षण स्वाध्याय कसा सोडवावा? हे PDF, Screen Record द्वारे आपल्या यूट्यूब चैनल, ब्लॉग, WhatsApp आदि च्या माध्यमातून जाहीररित्या प्रसिद्ध करून प्रशिक्षणाच्या गोपनीयतेचा भंग केल्याचे या कार्यालयाच्या निदर्शनास आलेले असून सदरची बाब ही अतिशय गंभीर आहे. याबाबत संबंधितांचे पुरावे ही गोपनीयरित्या प्राप्त करून घेण्यात आलेले असून अशा प्रशिक्षणार्थ्यांच्या विरोधात IT act 2000, IPR 2003 व COPYRIGHT act 1957 नुसार आवश्यक कारवाई संबंधित शैक्षणिक विभागाचे शिक्षण उपसंचालक यांचेमार्फत प्रस्तावित करण्यात आलेली आहे. सदरच्या जाहीर प्रकटनानुसार आपणा सर्वांना सुचित करण्यात येते की, यापुढे असे घटक,
चित्रफिती, चाचणी व स्वाध्याय आपल्या यूट्यूब चैनल वा कोणत्याही समाज माध्यमातून प्रसिद्ध केल्यास
आवश्यक ती दंडात्मक कारवाई या कार्यालयामार्फत आपणा विरोधात प्रस्तावित करण्यात येईल, याची
सर्वांनी नोंद घ्यावी.